
सध्या लग्नाचा season चालू आहे. परवा असाच रस्त्याने जाता जाता एक लग्नाची वरात दिसली. नवरदेवाचा घोडा(उंच पुरा आणि धिप्पाड) अतिशय सुंदर रंगीबेरंगी कापडाने सजविला होता. घोड्या समोर वराती मंडळी नाचत होती, कोणी घोड्यासोबत(अर्थात नवरदेवाला फ्रेम मध्ये घेऊनच) सेल्फी काढत होती. थोड्या वेळात वरात संपली, घोड्याला एका झाडाखाली बांधले. मस्त हिरवागार गवत/चारा त्याच्या पुढ्यात येऊन पडला आणि घोडा चारा खाऊ लागला. हे सर्व पाहून असा वाटलं की काय नशीबवान घोडा आहे ना. इतर मोकळ्या, धावणाऱ्या घोडयाना हेवा वाटावा असे या घोड्याचे lifestyle. पण त्याच वेळी विचार मनात आला की कोण खरं जगतोय? लग्नातला घोडा की धावणारा घोडा?
जाणीवपूर्वक विचार केला तर याचं उत्तर मिळेल की खरं आयुष्य जगतोय तो धावणारा घोडा. आता तुम्ही म्हणाल कसं? सांगतो. घोड्याचा मूळ स्वभाव कोणता? तो म्हणजे धावणे. इथे कोणत्या घोड्याला धावायला मिळतंय? लग्नातल्या की इतर घोडयांना? लग्नातल्या घोड्याला 'धावणे' ही गोष्ट सोडून सर्व काही मिळतंय. अशा वेळी मला 'दीवार' या हिंदी चित्रपटातील dialogue आठवतो. लग्नातला घोडा म्हणत असेल "मेरे पास सबकुछ है, अच्छे कपडे है, अच्छा खाना है, लोग मेरे सामने नाचते है वैगेरे वैगेरे…", तुम्हारे पास क्या है? इतर घोडे उत्तर देतात मेरे पास "धावणे" है(मी रोज मनसोक्त छान धावतो).
खरंय, आपल्या स्वभावाचे काम करणे म्हणजेच जगणे. इतर घोडे छान धावू शकतात हेच त्यांचे समाधान आहे तेच त्यांचे जगणे आहे . लग्नाच्या वरातीतील घोड्याप्रमाणे मिळणाऱ्या सुविधा घोड्याला खरंच समाधान देतात का? लग्नात तो खरंच त्याचं 'घोड्याचं' जीवन जगतोय का?
आता तुम्ही म्हणाल इथे आपण या घोड्याच्या उदाहरणाचा का विचार करतोय? या उदाहरणातील घोडे म्हणजे आपले प्रतीक आहे. जर आपण लक्ष्यपूर्वक पाहिले किंवा विचार केला तर असे दिसून येते की, अशी बरीचशी मंडळी लग्नातल्या घोड्याप्रमाणे, घोड्याला आवश्यक नसलेल्या सुख सुविधा(घोड्याच्या सुविधांशी तुलना करून पहा , अजून जास्त उलगडून सांगायची गरज नाही) मिळतात म्हणून आपल्या स्वभावाला सोडून काम करत आहेत. ती कामं त्यांना सर्व सुख सुविधा देतात, पैसे देतात पण समाधान देत नाहीत. या उलट काही मंडळी आपल्या स्वभावाला धरून काम करत आहेत आणि खऱ्या अर्थाने समाधानाने आयुष्य जगत आहेत.
आता आपल्यालाच ठरवायचं की, लग्नाच्या वरातीतल्या घोड्या प्रमाणे खोटे सुखी भासवणारे आयुष्य जगावे की आपल्या मूळ स्वभावाला धरून, आपल्या मूळ core/inner strengths ला धरून समाधानाचे आयुष्य जगावे. विचार करूया.. आपण कुठला घोडा म्हणून जगायचं?
