
लाकडी खेळण्यांना खरंच प्राधान्य द्यायचे का?
लाकडी खेळणी तयार करणे ही हजारो वर्षांपासून जोपासलेली कला आहे. खेळण्याचे स्वरूप बदलत गेले पण गुणधर्म शाश्वत राहिले आहेत.
खरे म्हणजे खेळणं हे खेळासाठी लागणारे साधन आहे. खेळण्यापेक्षा खेळ हे मुलांना व्यवहार ज्ञान देतात आणि जगायला शिकवतात. खेळ जर महत्वाचा असेल तर हे साधन(म्हणजेच खेळणं) लाकडी असेल काय किंवा इतर, काय फरक पडतो? चला हेच जाणून घेऊ.
खेळणी कशी असली पाहिजेत याबद्दल प्रमुख ३ मुद्दे बघूया.
१. निसर्गाशी नाते जोडणारे खेळणं
मुलं म्हणजे निसर्गाची परिपूर्ण कलाकृती. लाकडी खेळणी म्हणजे शुद्ध निसर्ग. ते कसं? लाकूड म्हणजे निसर्गाची शुद्ध कलाकृती आहे. या लाकडावर कारागिरी करून कलाकार आपली कला अतिशय आत्मीयतेने त्यावर साकारतो. परत, कला हि सुद्धा नैसर्गिकच आहे. उरला प्रश्न design आणि कार्यक्षमतेचा (functionality). लाकडी खेळण्यात व त्या मागील कारणात पारंपरिक व शाश्वत विचार दिसून येतात. म्हणजेच एखादी गोष्ट मुलात बदल घडवायचा असल्यास तो खेळण्यामार्फत सोप्या पद्धतीने कसा करता येईल हा विचार त्या खेळ व खेळण्यात दिसून येतो. म्हणजेच काय, खेळणी बनवताना एक मानवी स्पर्श होता, भावना होत्या. मुलांना केंद्रस्थानी ठेवून मुलांच्या शरीर-मन-बुद्धी विकासाच्या जाणिवेतून खेळ आणि खेळणी तयार होत असत. पण सध्या बरेच ठिकाणी फक्त व्यावसायिकतेच्या दृष्टीने खेळ आणि खेळणी तयार होत आहे हे पाहून थोडी खंत वाटते.
२. बदल होण्याजोगे खेळणे(Transformational)
मुले खेळण्यासोबत खेळताना आपण पहिले असेल तर असं दिसून येत की मुले वेगवेगळे प्रयोग करून पाहत असतात. उदा खेळणी आपटणे किंवा सजवणे तर कधी दोन भाग करणे किंवा अजून तिसरा नवीन नवीन भाग जोडत असतात. हे करताना त्यांची कल्पना शक्तीचा विकास होतोच पण त्यासोबतच विज्ञानातील आणि व्यवहारातील काही गोष्टी शिकत असतात. म्हणजेच खेळणं हे अपूर्ण असावे. मुले त्यांच्या कल्पना शक्तीने ते पूर्ण करत असतात. हे सर्व प्रयोग लाकडी किंवा मातीच्या खेळण्यात करणे सोपे जाते आणि जास्त वाव असतो.
३. किमान काही वर्षे टिकेल असे
मुले खेळण्यांवर प्रयॊग करतात त्यामुळे ते खेळणं इतके मजबूत असावे कि एका खेळण्यात केलेले बदल दुसऱ्या भावंडांपर्यंत पोहोचावेत आणि ते पाहून तो अजून नवीन प्रयोग/बदल करू शकतो. compounding इथे पण काम करते. खेळणी टिकाऊ असल्याचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे हि खेळणी व त्यात मुलांनी केलेले प्रयोग/बदल पुढील पिढीकरता नवीन नाविन्यपूर्ण खेळणी बनवण्यास उपयोगी पडतात. मला वाटतं हे इतर प्रकारच्या खेळण्यांपेक्षा लाकडी खेळण्यात जास्त शक्य आहे.
या सगळ्याचा अर्थ सर्वच इतर प्रकारची खेळणी निरूपयोगी आहेत का? नाही, वरील सर्व विचार करून तयार केलेली काही खेळणी सुद्धा बाजारात उपलब्ध आहे आणि तीही आपल्याकडे असावीत. तुलनेत लाकडी खेळणी जास्त योग्य वाटतात. मुलांना खेळणी निवडताना पालकांनी consciously विचार करून लाकडी खेळण्यांना किंवा transformational खेळण्यांना प्राधान्य द्यावे असते वाटतं.
© शैलेश बडगुजर
Founder आणि Creative Engineer at Kajva
7798633344
