
आज मी जाऊया खेळण्यांचीया गावा असा का म्हणतोय? चन्नापट्टणा(Channapatna) उर्फ खेळण्यांचे गाव, कर्नाटकची लाकडी खेळण्यांची राजधानी.
या गावातील रहिवासी गेल्या २०० वर्षांपासून रोजच्या जगण्यासाठी लाकडी खेळणी बनवत आहेत.
ही गोष्ट आहे एका आगळ्यावेगळ्या गावची. चन्नापट्टणा हे गाव कर्नाटक राज्यातील बँगलोर जवळ बँगलोर-मैसूर महामार्गावर बँगलोर पासून ६० किलोमीटर अंतरावर वसलेले गाव आहे. चन्नापट्टणाला कर्नाटकची 'खेळण्यांची राजधानी' किंवा 'खेळण्यांची भूमी'(कन्नड मध्ये "गोंबेगाला ओरु") असे सुद्धा म्हणतात. इथे घरोघरी लोकं त्यांच्या घरातच लाकडी खेळणी बनवताना आढळून येतात.
या गावातील लोक खेळण्यांमध्ये कसे आले आणि त्यात ते कसे मास्टर झाले याबद्दल बरेच किस्से आहेत. त्यातील एक सांगतो. १७०० च्या दशकातील राजाला कोणे एके दिवशी एका परदेशी पर्शियन पाहुण्यांनी एक सुंदर, आकर्षक आणि चकचकीत लाकडी खेळणे भेट दिले. ते लाकडी खेळणे राजाला इतके आवडले की राजाने ताबडतोब त्या परदेशी पर्शियन पाहुण्याला त्या लाकडी खेळणी बनवणाऱ्या कलाकाराला पर्शियाहुन आपल्या राज्यातील स्थानिक कलाकारांना ही कला शिकवण्यासाठी बोलावून घेतले. जे स्थानिक कलाकार ही कला शिकले ते चन्नापट्टणा या गावात स्थायिक झाले आणि इथे खेळण्यांच्या गावाच्या गोष्टीची सुरवात होते.
लाकडी खेळणी तर राज्यात बनायला लागली पण आता या लाकडी खेळण्यांना चकचिकत लाखेचे रंग कसे देतात याचे तंत्र शिकण्यासाठी, १९०४ मध्ये मैसूरच्या महाराजांनी 'मियान बावास्मिया' या स्थानिक कलाकाराला जपानला पाठवले. ते तंत्र तेथून शिकून आल्यावर त्याने ते तंत्र स्थानिक कलाकारांना शिकवले आणि त्यातून जन्म झाला या सुंदर चकचकीत आणि आकर्षक लाकडी खेळण्यांचा. खूप वर्षांपासून जवळपास ६००० कलाकार त्यांच्या २५५ घरांमध्ये आपला आत्मा ओतून ही खेळणी तयार करत आहेत. सोबतच ५०-५५ लहान कारखाने आहेत जे लाकडी खेळणी आणि काही शोभेच्या वस्तू बनवत आहेत.
तेव्हापासून या लाकडी खेळणी बनवण्याची पद्धत आणि लाखेच्या रंगाचे तंत्र आजही वापरले जात आहे. हे सर्व खेळणी बनवण्यासाठी स्थानिक Wrightia tinctoria या झाडाचे लाकूड वापरले जाते. खेळण्याला आकार मिळाल्या नंतर ते रंगीत लाखेने रंगवले जाते. त्यासाठी इथे अजूनही नैसर्गिक रंग जसे की हळद, कुंकू, नीळ असे वनस्पतीपासून आलेले रंग वापरले जातात. त्यामुळे ते मुलासाठी १००% अनुकूल ठरतात. लाखेने रंगवल्यानंतर या खेळण्यांना screwpine च्या पानाने घासले जाते. त्यामुळे या खेळण्यांना एक वेगळीच चकाकी मिळते. सर्वात महत्वाचे, त्यात मानवी स्पर्श आणि भावना आहेत आणि मुख्य म्हणजे आपली परंपरा जपणारी संस्कृती आहे. यामुळेच ही लाकडी खेळणी आपल्याला आणि मुलांना खूप भावतात. एकदा अनुभव घेऊन पहा.
इथे खूप साऱ्या कलाकारांना आणि त्यांच्या कुटुंबियाना खेळणी बनवणे हे एकच रोजगाराचे माध्यम आहे. एक कलाकार कुटुंब एकत्रित काम करून महिन्याला जवळपास २००-३०० खेळणी बनवतात. खेळणे बनवताना या कारागिरांना बरेचदा खेळणे बनवताना बोटाना जखमा होतात. पण त्यांच्या त्या कामाच्या आवडी पुढे ते त्याकडे दुर्लक्ष्य करतात. हे कलाकार लाकडी खेळणी, शोभेच्या वस्तू, लाकडी बांगड्या या सर्व प्रकारच्या पारंपरिक गोष्टी बनवत आहेत. पण आता यावर जगणे अवघड होत आहे.
पंधरा वर्षांपूर्वी ही खेळणी बनवणाऱ्या कलाकारांची संख्या होती ५०००. पण आता ती कमी होऊन उरली आहे फक्त १०००. यामागची करणेही बरीच आहेत. या कलाकारांना सुंदर खेळणी बनवायला खूप आवडत, पण तेच जेव्हा विकण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्या बद्दल अनुभव नाही किंवा ज्ञान नाही. आत्ताच्या डिजिटल युगात ते कसे करायचे हे समजत नाही. त्यामुळे त्या खेळण्यांना त्यांना अपेक्षित असलेला भाव मिळत नाही. आणि नवीन पिढीच्या आशा-आकांशा खूप वाढत जात आहेत. खेळणे बनवण्यातून होणारी कमाई अत्यल्प असल्याने येथील कुटुंबाना असे वाटायला लागते की आपल्या मुलांनी डॉक्टर/इंजिनीअर किंवा तत्सम पदवी घ्यावी आणि नोकरीला लागावे. त्यातच बाजारातील प्लास्टिकचे चायनीज स्वस्त खेळणी या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. कारण एखाद्या स्वदेशी स्थानिक लाकडी भवऱ्याची किंमत १००रुपये असेल तर तोच भवरा चायनीज प्लास्टिक खेळण्यांमध्ये १०-१२ रुपयांना मिळतो(त्यांची quality बघितली तर त्याला 'प्लास्टिकची टरफले' हीच उपमा योग्य ठरते). किमतीत जवळपास ९ पटीने फरक. याचे कारण तिकडे सर्व प्लास्टिक व मशीनमेड(ज्यात त्या खेळण्यासोबत कुठलीही भावना जोडलेली नाही). अशा व्यवसाय म्हणून काम करणाऱ्या उद्योगांच्या खेळण्यांच्या या किमतीतील ९ पटीच्या फरकाला टक्कर देणे एका रोजगारासाठी काम करणाऱ्या कलाकाराला जमत नाही. त्यामुळे ही कलाकार मंडळी आणि त्यांची ही कला कमी होण्याच्या मार्गावर आहे.
ही कला नष्ट होऊ नये म्हणून बरयाचश्या सेवाभावी संस्था पुढे येऊ लागल्या आहेत. कलाकारांना at-least जगण्यापुरता लागणारा पैसा यातून कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न होत आहेत. पण तरी हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. काही खेळणी निर्मात्यांचे म्हणणे आहे की हे असेच चालू राहिले तर पुढील काही दशकांमध्ये ही कला संपुष्टात येईल.
ही कला आणि कलाकृती जपायची असेल तर दोन्ही बाजूवर काम झाले पाहिजे. एक बाजू म्हणजे ही लाकडी खेळणी तयार करणारी सिस्टिम आणि दुसरी म्हणजे विकत घेणारी मानसिकता. थोडं विस्तार करून सांगतो.
पहिली बाजू ती म्हणजे खेळणे बनवणारी ही मंडळी किंवा संस्था, यांच्यासाठी,भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी नुकत्याच झालेल्या भारतीय खेळणी महोत्सवात एका गोष्टीची जाणीव करून दिली ती म्हणजे innovation. या खेळण्यांना तयार करताना आपली परंपरा संस्कृतीला धरूनच पण आजच्या मुलांना ते कसे आवडेल याचा नाविन्यपूर्ण पद्धतीने विचार करून खेळणी design करून बनवली गेली पाहिजेत. तसेच ती सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा यासाठी intelligently आणि effectively कसा वापर केला पाहिजे यावर विचार आणि काम झाले पाहिजे. याच्या डिजिटल मार्केटिंगसाठी आपल्यातील काही मंडळी शहरातून सुद्धा काम करून या कलेला जिवंत ठेवण्यासाठी हातभार लावू शकतात.
दुसरी बाजू ती म्हणजे खेळणी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मानसिकता. आपल्याकडून या प्राचीन उद्योगाला आधार देण्याचा एकमात्र मार्ग आहे तो म्हणजे खेळणी विकत घेताना जेथे जेथे शक्य असेल तेथे मशीनवर बनलेलया खेळण्यांपेक्षा या मानवी स्पर्श, भावना आणि कला असणाऱ्या लाकडी खेळण्यांना प्राधान्य देणे. ही मानसिकता आपण नक्कीच आपल्यात आणु करू शकतो.
त्यामुळेच जाऊया खेळण्यांचीया गावा हा संकल्प करून त्यावर काम सुरु केले आहे. मागच्या महिन्यात माझ्या कुटुंबासहित तिथे प्रत्यक्ष जाऊन ३ दिवस वेगवेगळ्या कारागिरांना त्यांच्या कुटुंबाना भेट दिल्या. त्यांच्या कला व कारागिरी जवळून अनुभवण्याचा योग आला. त्यातूनच ही कला टिकली पाहिजे ही भावना अजून तीव्र झाली आणि याला कसे support केला जाऊ शकतो यावर अभ्यास सुरु केला आहे.
याच अभ्यासातील एक प्रयत्न म्हणजे Kajva आणि हा लेख.
कधी वेळ मिळाला तर किंवा वेळ काढून या खेळण्यांच्या गावाला नक्की भेट द्या. तो पर्यंत आपल्या परिने या कला कशा जपता येतील यावर मंथन करत आणि योग्य त्या गरजेच्या actions घेत राहूया.
© शैलेश बडगुजर,
Founder And Creative Engineer at Kajva
www.kajva.com
7798633344
