Blog

परवा मित्राच्या घरी काही लाकडी खेळणी डिलिव्हरीसाठी गेलो होतो. त्याच्या घराच्या गॅलरी मध्ये एक पोपट त्याच्या पिंजऱ्याबाहेर चालत होता. मी मित्राला विचारले, "हा पिंजऱ्यातून बाहेर कसा काय? उडून जात नाही का?". तो म्हणाला,  "नाही ना, तो उडून का जात नाही याचे मला पण याचं आश्चर्य वाटतं". मी विचारलं, "हा केव्हा पासून आहे तुझ्या सोबत?".  तो म्हणाला,  "त्या पोपटाचा जन्म पिंजऱ्यातच झाला आहे". 

मी घराकडे निघालो, घरी येताना माझे विचारचक्र सुरुच होते. याला देवाने पंख दिले आहेत आणि उडण्याची क्षमता दिली आहे तरी हा उडत का नाहीये? उडण्याच्या क्षमतेमुळे त्याला बाहेर खूप साऱ्या वेगवेगळ्या झाडावर, जंगलात मानसोक्त फिरता येईल, वेगवेगळ्या प्रकारची गोड-आंबट फळं शोधून चाखायला मिळू शकतात. दरी-डोंगर पार करून नव-नवीन भागात फिरुन येता येईल. नवीन मित्र करता येतील. पण बाहेरील स्वातंत्र्यात एवढ्या शक्यता असताना याला पिंजऱ्याबाहेर सोडले तरी हा पोपट उडून का जात नाही? 

याचा बारकाईने विचार केले तर लक्ष्यात येते की हा जन्मापासूनच इथे पिंजऱ्यात असल्यामुळे 'आपल्याला पंख आहेत आणि त्याचा उपयोग उडण्याकरता करायचा आणि उडण्याची क्षमता आपल्यामध्ये inbuilt आहे' हे त्याला माहीतच नाहीये. कारण इतर कोणत्या पोपटाला त्याने उडताना पाहिलेच नाहीये. पंखांच्या जोरावर उडून काय काय होऊ शकते याची कल्पना त्याला नाहीये आणि ती कल्पना कोणी करवून पण दिली नाहीये. त्याला असं वाटतंय की मालक जे काही पिंजऱ्यात आणून देतोय पेरू/मिरची /बिस्कीट हेच आपलं सर्वोच्च अन्न आहे आणि त्यासाठी आपल्याला काहीही करावं लागत नाहीये(कधी कधी मालकाला आवडतं म्हणून मिठू मिठू ओरडून दाखवायचं आहे एवढंच). पिंजऱ्यात आपण अगदी सुरक्षित आहोत. मग आपल्याला एवढं सारं सुरक्षित आयुष्य मिळतंय तर का म्हणून उगाचच आपल्याला दिलेल्या पंखांचा वापर करून जंगलात जाऊन असुरक्षितता ओढून घ्यायची. असा विचार केल्यामुळे त्याला तो पिंजरा सोडावासा वाटत नाहीये. पण त्यामुळे तो वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या स्वभावाला (म्हणजे त्याच्या पंखांना आणि उडण्याच्या क्षमातेला) सोडून जगत असल्याने तो आयुष्यातील नवनवीन संधींना आणि खऱ्या जगण्याला मुकत आहे, असे नाही का वाटत? 

आता तुम्ही म्हणाल या पिंजऱ्यातील पोपटाचा एवढा विचार का करण्याची गरज आहे?

या पोपटाच्या जागी माणसाला ठेवून बघूया आणि पिंजऱ्याच्या जागी 'comfort zone' ला. देवाने प्रत्येक माणसाला पोपटा प्रमाणे पंख म्हणजे काहीतरी inbuilt गुण आणि क्षमता दिल्या आहेत. पोपटातील दिलेल्या उडण्याच्या क्षमतेप्रमाणे  माणसाला देखील आपल्या गुण आणि क्षमतांचा वापर करून आयुष्यात उंच उडता येऊ शकते. आपल्या गुणांना आणि क्षमतेला धरून म्हणजेच आपल्या स्वभावा धरून माणूस खूप काही करू शकतो. या जगात वेगवेगळ्या सुंदर गोष्टी निर्माण करू शकतो. त्याला खूप साऱ्या संधी उपलुब्ध होऊ शकतात. ज्यांनी ज्यांनी त्यांच्या स्वभावाला/आवडीला/पंखांना  धरून उडण्याच्या प्रयत्न केला ते खरंच एका उंचीला पोहचले आहेत. याची खूप सारी उदाहरणे आहेत या जगात. त्यातील काही म्हणजे लता मंगेशकर(गळा आणि गाणं), सचिन तेंडुलकर(चपळता आणि खेळ), अजय-अतुल(संगीत आणि गाणं) इत्यादी. 

पोपटाप्रमाणे प्रश्न येतो की, मग आपण माणसं आपल्या पंखांचा उपयोग करून उडत का नाही? असे दिसून येते कि बरेचदा माणूस कुठल्यातरी comfort zone च्या पिंजऱ्यात तर अडकलेला आहे. आपण आपल्या inbuilt क्षमतांचा उपयोग करून उडत का नाही याची पोपटाप्रमाणे दोन कारणं आहेत. एक म्हणजे 'आपल्याला असलेल्या पंखाची  आणि उडण्याच्या क्षमतेची जाणावीं नसणे' आणि दुसरे कारण म्हणजे 'comfort zone(सुरक्षितता) न सोडणे'. आयुष्यात माणसाला जर काही मोठं कार्य करायचं असेल, जगात त्यांच्याद्वारे काही महत्वाचे बदल घडवायचे असतील तर आपल्याला या दोन्ही गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. आपला स्वभाव(गुण आणि क्षमता) ओळखणं आणि जगण्यासाठी त्याचा वापर कसा करायचा हे शिकून घेणे आणि comfort झोन सोडून स्वतंत्र उडून वेगवेगळ्या संधी शोधून त्यावर काम करणे हा एकाच मार्ग आहे. 

थोर कवी जगदीश खेबुडकर एका गीतात फार सुदररित्या हे मांडतात: 

आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. 

तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने
दरी, डोंगर, हिरवी राने जा ओलांडुनिया सरिता सागरा

सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. 

चला तर मग, आपल्यातील inbuilt पंखाना(गुणांना आणि क्षमतेला) शोधूया आणि त्याचा जगण्यासाठी कसा वापर करायचा हे शिकून सामर्थ्याने या जगात विहार करूया. 

© शैलेश बडगुजर
७७९८६३३३४४  
shaileshbadgujar.com    

Leave a comment